तेलगाव बस स्थानकात महिला प्रवाशाचे मंगळसूत्र चोरी; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
तेलगाव बस स्थानकात महिला प्रवाशाचे मंगळसूत्र चोरी; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
पोलीस आणि एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष, महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर : तेलगाव बस स्थानकात बसमध्ये चढत असताना एका महिला प्रवाशाचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेलगाव बस स्थानक हे बीड जिल्ह्यातील महत्त्वाचे बस स्थानक असून, परळी, माजलगाव, वडवणी आणि धारूर या चार तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या बस स्थानकावरून लांब पल्ल्याच्या बसची नियमित वाहतूक सुरू असते. त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. मात्र, एवढी वर्दळ असूनही या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी कधीही दिसून येत नाही.
(दिनांक 11 मार्च ) माजलगाव-चिपळूण बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेऊन एका चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढला. महिला बसमध्ये गेल्यानंतर तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरड केल्यानंतर बस काही वेळ थांबवण्यात आली. मात्र, चोरट्याचा काही पत्ता लागला नाही. तेलगाव बस स्थानकात अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही बस स्थानकात अनेक चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. बस स्थानकात चोरट्यांचा सतत वावर असतो. मात्र, पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळ याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी महिला आणि शाळकरी मुलींची सतत ये-जा असते. त्यामुळे येथे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. मात्र, पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच, एसटी महामंडळालाही या गोष्टीचा विसर पडला आहे.
पुण्यातील स्वारगेट येथील घटना ताजी असताना बस स्थानकामध्ये पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे. बस स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये किंवा काही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. मात्र, तेलगाव पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी या बाबतीत गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे अशा घटना रोखायच्या असतील, तर बस स्थानकामध्ये कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment