राजमाता जिजाऊ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; स्पर्धा परीक्षांवर व्याख्यान



राजमाता जिजाऊ महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात; स्पर्धा परीक्षांवर व्याख्यान

  डॉ. बी. के. भाबरदोडे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; व्यक्तिमत्त्व विकासावर भर
बातमी:

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागातर्फे 'व्यक्तिमत्त्व विकास आणि स्पर्धा परीक्षा' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई येथील राज्यशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. बी. के. भाबरदोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
   आपल्या व्याख्यानात डॉ. भाबरदोडे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू कसे महत्त्वाचे ठरतात, यावर सविस्तर माहिती दिली. प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता यांच्या एकत्रित प्रयत्नांतून कुशल प्रशासक घडण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच, आजचे युग स्पर्धेचे असून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध प्रशासकीय सेवांमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून योग्य दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.
  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच निश्चित ध्येय ठेवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करण्याचे व्रत अंगीकारावे, असे आवाहन त्यांनी केले.
   कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांचे पाहुण्यांनी स्वागत केले.
   राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नागोराव वाघमारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. सच्चिदानंद ढेपे, कार्यालय अधीक्षक केशव भोंडवे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  विद्यार्थिनी वैष्णवी साळवे आणि वैष्णवी यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. प्रशांत सोळंके यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!