किल्ले धारूर तालुक्यातील शेतकरी कार्यशाळेत सोयाबीन व तूर उत्पादनावर मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
किल्ले धारूर तालुक्यातील शेतकरी कार्यशाळेत सोयाबीन व तूर उत्पादनावर मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: येथील लोकपकार शेतकरी उत्पादक कंपनी लि. धारूर यांच्या वतीने आयोजित सोयाबीन व तूर उत्पादन वाढ या विषयावरील शेतकरी कार्यशाळेला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. गुरुवार, दि. १५ मे २०२५ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत संपन्न झालेल्या या कार्यशाळेत मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून मार्गदर्शन प्राप्त केले.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदाडे आणि निवृत्त कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. बी. पी. पाटील यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तूर पिकांच्या आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यांनी जमिनीची निवड, बी-बियाणे, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि कीड व रोग नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना आगामी काळात निश्चितच फायदा होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
याप्रसंगी तालुका कृषी कार्यालयाचे कार्यक्रम अध्यक्ष श्री.जे.बी भगत तालुका कृषी अधिकारी धारूर यांनी कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली आणि त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्री. दळवी यांनी केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकपकार संस्थेचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप भैय्या शिनगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
एकंदरीत, ही कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त ठरली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोयाबीन आणि तूरचे उत्पादन कसे वाढवावे, याबाबत शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment