बीड जिल्हा नियोजन समिती बैठक: विकासकामांवर चर्चा, समस्यांवर तोडगा
बीड जिल्हा नियोजन समिती बैठक: विकासकामांवर चर्चा, समस्यांवर तोडगा
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर :- पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत सन २०२५-२६ च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीसोबतच जिल्ह्यातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली.
माजलगाव मतदारसंघातील समस्यांवर प्रकाश सोळंकेंनी मांडले मुद्दे:
माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी धारूर घाटातील वारंवार होणाऱ्या अपघातांचा मुद्दा उपस्थित केला. या ठिकाणी घाट कटिंग आणि रुंदीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवाशांची सुरक्षा वाढेल, असे त्यांनी सांगितले.
जल जीवन मिशनच्या अपूर्ण कामांवर चिंता:
शासनाने 'हर घर जल' या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र, बीड जिल्ह्यात या योजनेची कामे अद्यापही अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. आमदार सोळंकेंनी या अपूर्ण कामांना गती देऊन ती तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना देण्याची विनंती केली.
खतटंचाई टाळण्यासाठी उपाययोजना:
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही आमदार सोळंकेंनी केली. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त खतपुरवठा करावा, असे त्यांनी सुचवले.
या बैठकीत जिल्ह्यातील इतर विकासकामांवरही चर्चा झाली.
Comments
Post a Comment