आमदार प्रकाश सोळंकेंच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन; डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती
आमदार प्रकाश सोळंकेंच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयात भव्य मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन; डॉ. राऊत यांची प्रमुख उपस्थिती
धारूरमध्ये गरीब व गरजू रुग्णांना मिळणार मोठा आधार; नोंदणीला सुरुवात
सुर्यकांत जगताप
धारूर, दि. ५ मे २०२५: धारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी उद्या, दिनांक ६ मे २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालयात एका महत्त्वपूर्ण आरोग्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या वतीने सकाळी १०:३० वाजता भव्य बिनटाका कुटुंब कल्याण व सामान्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन लोकप्रिय आमदार, सन्माननीय नामदार श्री. प्रकाशदादा सोळंके यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या सामाजिक बांधिलकीतून साकारलेल्या उपक्रमामुळे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या शिबिरामध्ये पुरुष व महिलांसाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, शरीरावरील गाठी काढणे, हर्निया, अपेंडिक्स आणि इतर लहान स्वरूपाच्या शस्त्रक्रिया बिनटाक्याच्या पद्धतीने पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासण्या, औषधे आणि रुग्णालयातील निवास यासह सर्व सुविधा रुग्णांना विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत.
या शिबिरासाठी इच्छुक रुग्णांना आज, ५ मे २०२५ रोजी पूर्वनोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीच्या वेळी रुग्णांची रक्त, लघवी व इतर आवश्यक तपासण्या केल्या जातील.
या कार्यक्रमाला बीड जिल्ह्याचे आदरणीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राऊत साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंडाळ साहेब आणि आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व तज्ञ डॉक्टर देखील उपस्थित राहतील.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी शासन आणि आरोग्य विभाग नेहमीच प्रयत्नशील असतात. धारूर ग्रामीण रुग्णालयाचा हा उपक्रम याच प्रयत्नांचा एक भाग आहे, असे मत आमदार प्रकाश सोळंखे यांनी व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल परदेशी आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यांनी जास्तीत जास्त गरजूंनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नोंदणीसाठी संपर्क: डॉ. परवेज शेख – ९८९०८९००२४
Comments
Post a Comment