अंजनडोह: जलजीवन मिशन अधूरं, ग्रामपंचायतचा उपोषणाचा इशारा
अंजनडोह: जलजीवन मिशन अधूरं, ग्रामपंचायतचा उपोषणाचा इशारा
( सुर्यकांत जगताप )
किल्ले धारूर, 17 जानेवारी: धारूर तालुक्यातील अंजनडोह ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन योजनेतील कामे अपूर्ण असल्याने जिल्हा प्रशासनाला उपोषणाचा इशारा सरपंच सौ. उषा सोळुंके यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 45 लााख रुपयांच्या या योजनेत पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाइनचे काम पूर्ण झाले असले तरी, विद्युत पंप लावून पाणीपुरवठा सुरू करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. यामुळे आगामी काळात गावात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना वारंवार सूचना दिल्या असून, कार्यकारी अभियंत्यांनी अंतिम नोटीसही दिली आहे. तरीही काम पूर्ण होत नसल्याने ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून 26 जानेवारी रोजी जिल्हा परिषद येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायतीने नमूद केले आहे की, जर या कामात लवकरच गती आली नाही तर गावातील शेकडो नागरिकांना पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल.
यासंदर्भात ग्रामपंचायतीने आमदार माजलगांव विधानसभा, जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती धारूर यांनाही कळवले आहे.
ग्रामपंचायतीच्या या पाऊलामुळे जिल्हा प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देईल आणि जलजीवन मिशन योजनेचे काम लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment