किल्ले धारूर तालुक्याच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह, आमदार सोळंके यांची खरखरीत टीका
किल्ले धारूर तालुक्याच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह, आमदार सोळंके यांची खरखरीत टिका.
किल्ले धारूर, ( सुर्यकांत जगताप )
3 जानेवारी 2025: पंचायत समिती किल्ले धारूर येथे माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील विकास कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. या बैठकीत शिक्षण, आरोग्य,एकात्मिक बाल विकास,पंचायत राज,बांधकाम विभाग, पशुधन, जलजीवन मिशन, लघु पाटबंधारे आणि कृषी अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
शिक्षण क्षेत्रात कमतरता:
बैठकीची सुरुवात शिक्षण विभागाच्या आढाव्याने झाली. गटशिक्षणाधिकारी श्री कोल्हे यांनी धारूर तालुक्यातील शासकीय आणि खाजगी शाळांची सविस्तर माहिती सादर केली. विशेषतः मुलींच्या वस्तीगृहासाठी स्पेशल पाईपलाईन प्रकल्पाबाबत त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. मात्र, शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव, आणि शैक्षणिक साहित्याचा अभाव अशा अनेक समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमदार सोळंके यांनी शिक्षण विभागाच्या सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या कार्यस्थळी राहण्याचे निर्देश दिले.
आरोग्य सुविधांचा अभाव:
तालुका आरोग्य अधिकारी श्री लोमटे यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या उद्दिष्टांची अपूर्णता याबाबत आपली चिंता व्यक्त केली. आमदार सोळंके यांनी जिल्हा चिकित्सक डॉक्टर थोरात यांना फोन करून याबाबत आवश्यक सूचना दिल्या.
पशुधन विभागातील दुर्लक्ष:
पशुधन विभागाच्या आढाव्यात धारूर तालुक्यातील 71 गावांमधील पशुदवाखान्यांची माहिती सादर करण्यात आली. मात्र, अनेक गावांमध्ये पशुवैद्यकांचा अभाव, पशुखाद्य उपलब्धतेची समस्या आणि पशुसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांना पुरेसे मार्गदर्शन न मिळणे यासारख्या समस्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
जलजीवन मिशनमधील गंभीर दोष:
जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा घेताना अभियंता मॅडम यांनी 64 कामांपैकी केवळ 2 कामे पूर्ण झाल्याचे सांगितले. या विलंबावरून आमदार सोळंके यांनी नाराजी व्यक्त केली आणि संबंधित एजन्सीवर दंड लादण्याची शिफारस केली. यासोबतच, अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे, काही ठिकाणी पाणीपुरवठा नियमित नसल्याचे आणि काही ठिकाणी पाण्याची गुणवत्ताही प्रश्नार्थाखाली असल्याचे निदर्शनास आले.
अन्य विभाग:
बैठकीत पंचायती विभाग, कृषी विभाग आणि नरेगा विभागाच्या कार्याचाही सखोल आढावा घेण्यात आला. या सर्व विभागांमध्येही काही न काही कमतरता आढळून आल्या.
या आढावा बैठकीतून धारूर तालुक्यातील विकास कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. मात्र, यावेळी अनेक विभागांमध्ये कामे अपूर्ण असल्याचे, अधिकाऱ्यांची उदासीनता असल्याचे आणि नागरिकांना आधारभूत सुविधा मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. आमदार सोळंके यांनी संबंधित पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना आणि अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments
Post a Comment