बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर : मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पासून सामूहिक साखळी उपोषण करणार आहेत. तसेच, विविध राजकीय पक्ष आणि संघटना पोस्टे केज येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी आंदोलने करत आहेत. यामुळे जिल्ह्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त, 11 फेब्रुवारी 2025 पासून बारावीची आणि 21 फेब्रुवारी 2025 पासून दहावीची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे, आंदोलने आणि परीक्षांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखणे प्रशासनासाठी महत्त्वाचे आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करून, जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जमावबंदी आदेश लागू करणे आवश्यक होते. या आदेशानुसार, 15 फेब्रुवारी 2025 च्या 00.01 वाजेपासून ते 1 मार्च 2025 च्या 24.00 वाजेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू राहील.
या आदेशामध्ये खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे:
* शस्त्र, सोटे, काठी, तलवार, बंदूक जवळ बाळगणे.
* लाठ्या, काठ्या, शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील अशा वस्तू बाळगणे.
* कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणे.
* दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे गोळा करणे, बाळगणे किंवा तयार करणे.
* प्रक्षोभक भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणे.
* सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे जिल्ह्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक बाळगणे.
* जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जी देशाच्या संविधानातील मूल्यांच्या विरुद्ध असेल ती करणे.
* व्यक्ती, शव, प्रेत, आकृती किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे.
* पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येणे किंवा मिरवणूक, मोर्चा काढणे.
शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास या गोष्टी करण्यास मनाई असेल. विशेष परिस्थितीत, परवानगी दिलेल्या मिरवणुकीस हा आदेश लागू राहणार नाही.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments
Post a Comment