किल्ले धारूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह: भगवामय वातावरण आणि विविध उपक्रमांनी शहर दुमदुमले
किल्ले धारूरमध्ये शिवजयंतीचा उत्साह: भगवामय वातावरण आणि विविध उपक्रमांनी शहर दुमदुमले
छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य कार्यक्रम, महिला मंडळांचा किल्ल्यावर विशेष सहभाग, तरुणाईच्या उपक्रमांनी वेधले लक्ष
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर शहरामध्ये यंदाही १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर भगव्यामय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरपरिषद आणि शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावर्षी शिवजयंती विशेष ठरली, कारण अनेक वर्षांपासूनची धारूरकरांची मागणी पूर्ण झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला. यामुळे नागरिकांमध्ये विशेष आनंद होता. गेल्या ३५ वर्षांपासून या चौकात शिवजयंती साजरी होत आहे.
शहरातील महिला मंडळांनी महादुर्ग किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. महिलांनी किल्ल्यावर पाळणागीते गाऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. किल्ल्यावर महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
नवतरुण उद्योजकांनी शहरातील नागरिक, लहान मुले आणि महिलांसाठी अल्पोपाहाराची सोय केली होती. या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. बाजारपेठ परिसरातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
ऐतिहासिक किल्ले धारूर शहरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी झाली.
Comments
Post a Comment