अवरगावात 'ग्राम दरबार' : प्रशासनाचा थेट जनतेशी संवाद
अवरगावात 'ग्राम दरबार' : प्रशासनाचा थेट जनतेशी संवाद
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी लोखंडे यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवरगाव येथे विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार काल दि. 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात 'ग्राम दरबार' या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी श्री. लोखंडे यांच्या उपस्थितीत आणि सरपंच श्री. अमोलजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
या 'ग्राम दरबार'मध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, पाणीपुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, स्वच्छता विभाग, सिंचन व जलसंधारण विभाग यांसारख्या विविध विभागांच्या प्रमुखांनी उपस्थित राहून अवरगाव येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या 'ग्राम दरबार'च्या माध्यमातून सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांसमोर थेट आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. तसेच, अनेक कार्यालयांना भेटी देऊनही ज्या अधिकाऱ्यांची भेट होत नाही, ते सर्व अधिकारी गावात दिवसभर थांबून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास मदत करत होते.
या कार्यक्रमात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये गावातील गरजू रुग्णांनी लाभ घेतला. पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून पाळीव पशुंची तपासणी आणि उपचार केले. रोजगार हमी योजनेतील प्रलंबित कामे आणि नवीन योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. अशा प्रकारे, प्रत्येक विभागाचे काम पूर्ण करून नागरिकांना प्रशासनाकडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सरपंच श्री. अमोलजी जगताप यांनी 'ग्राम दरबार' हा उपक्रम प्रत्येक गावात राबवला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आदर्श ग्रामपंचायत अधिकारी श्री. बाळासाहेब झोंबाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि सरपंच श्री. अमोलजी जगताप यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला अवरगाव येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
Comments
Post a Comment