दुर्गम भागात शेततळ्यात अफूची शेती; तीन अधिकारी, 12 पोलिसांची शोध मोहीम यशस्वी
* 13 वर्षांनंतर धारूरमध्ये पुन्हा अफूची शेती उघड
* शेततळ्याच्या माध्यमातून पाणी साठवून अफूचे पीक
* तीन गुंठे क्षेत्रावर लागवड; 40 ते 50 गोण्या अफू जप्त होण्याचा अंदाज
किल्ले धारूर ( सुर्यकांत जगताप )
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने बालाघाट पर्वतरांगेतील दुर्गम भागात तीन गुंठे जमिनीवर अफूची लागवड केली होती. या लागवडीसाठी त्याने शेततळ्याचा वापर करून पाणीपुरवठा केला होता. अफूच्या शेतीबाबत बीड एलसीबीला माहिती मिळाल्यानंतर, तीन अधिकारी आणि 12 पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी शोध मोहीम राबवली.
दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालली. या दरम्यान, पोलिसांनी तीन गुंठे जमिनीवरील अफूची झाडे उपटून काढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अफूचे वजन आणि किंमत मोजल्यानंतरच या प्रकरणातील अधिक तपशील समोर येईल. प्राथमिक अंदाजानुसार, 40 ते 50 गोण्यांपेक्षा जास्त अफू जप्त करण्यात आली आहे.
या घटनेमुळे धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 10 वर्षांपूर्वी परळी आणि धारूरमधील कानपूर येथेही अफूची लागवड उघडकीस आली होती. अफूचा वापर नशेसाठी केला जातो. दुर्गम भागात शेततळ्याच्या मदतीने अफूची लागवड केल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Post a Comment