शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी सामूहिक उपवास: १९ मार्च रोजी हुतात्मा स्मारक, धारूर येथे सहवेदना दिन
शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी सामूहिक उपवास: १९ मार्च रोजी हुतात्मा स्मारक, धारूर येथे सहवेदना दिन
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन; शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एकजूट होण्याचे आवाहन
सुर्यकांत जगताप
१९ मार्च हा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. याच दिवशी १९८६ साली साहेबराव आणि मालतीताई करपे यांनी आपल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. आज ३८ वर्षांनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १९ मार्च रोजी हुतात्मा स्मारक, किल्ले धारूर येथे 'शेतकरी सहवेदना दिन' साजरा करण्यात येणार आहे.
या दिवशी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सामूहिक उपवास आणि श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत शेतकरी आणि नागरिक एकत्र येऊन अन्नत्याग करतील. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
या आंदोलनात शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, साहित्यिक, पत्रकार आणि विचारवंत सहभागी होणार आहेत. तसेच, देश-विदेशातील नागरिकही या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
या आंदोलनाची प्रमुख मागणी म्हणजे, शेतकऱ्यांचा गळफास ठरलेले तीन मुख्य जीवघेणे कायदे रद्द करावेत. तसेच, शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करणे आणि शेतकऱ्यांचे हक्क व अस्तित्व वाचवणे हे या आंदोलनाचे उद्दिष्ट आहे.
या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या दुःखाला आवाज द्या, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
#शेतकऱ्यांसाठीएकत्रयेऊया #किसानपुत्रांचा_एल्गार #१९मार्च_आत्मक्लेशआंदोलन
Comments
Post a Comment