कर्तृत्ववान महिलांचा किल्ले धारूर युथ क्लबकडून गौरव!
कर्तृत्ववान महिलांचा किल्ले धारूर युथ क्लबकडून गौरव!
जागतिक महिला दिनानिमित्त धारूरमध्ये विशेष कार्यक्रम; विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान
सुर्यकांत जगताप
किल्लेधारूर: धारूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युथ क्लब संघटनेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. शनिवारी, २२ मार्च रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय नाट्यगृहात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या उपजिल्हाधिकारी अंजली हजारी, अध्यक्ष प्रा. दीप्ती मिश्रा आणि युथ क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष दुबे, व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अतुल शिनगारे, युथ क्लब अध्यक्ष दत्ता गोरे यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी अंजली हजारी, नेमबाज जागृती तिवारी, गायिका गीता नागरगोजे, शिवणकाम व्यवसायातून मुलांना उच्चशिक्षित करणाऱ्या रेखा कंकाळ, प्राचार्य ज्योतीदेवी हजारी, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. संध्या गुन्नाल आणि कवयित्री साक्षी मुंडे यांचा समावेश होता.
उपजिल्हाधिकारी अंजली हजारी आणि प्रा. दीप्ती मिश्रा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर रेखा कंकाळ आणि डॉ. संध्या गुन्नाल यांनी युथ क्लबचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. विजय शिनगारे यांनी जागतिक जल दिनानिमित्त पाणी बचतीचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सूर्यकांत जगताप यांनी केले आणि आभार विश्वनंद तोष्णीवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युथ क्लबचे अध्यक्ष दत्तात्रय गोरे, सचिव विश्वनंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष बाबा देवडे आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment