कला शाखेतून विविध क्षेत्रांत करिअर घडविता येते - प्रा. प्रशांत प्रक्षाळे


कला शाखेतून विविध क्षेत्रांत करिअर घडविता येते - प्रा. प्रशांत प्रक्षाळे

राजमाता जिजाऊ महाविद्यालयात 'कला शाखेतील रोजगाराच्या संधी' या विषयावर व्याख्यान संपन्न

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर, दि. २० मार्च: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राजमाता जिजाऊ महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोकप्रशासन विभागाच्या वतीने 'कला शाखेतील रोजगाराच्या संधी' या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात प्रा. प्रशांत प्रक्षाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. प्रक्षाळे म्हणाले, "कला शाखेतील अध्ययनातून विविध क्षेत्रांत करिअर घडविता येते. केंद्र लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षामधून करिअर निवडता येतो. त्याबरोबरच कला शाखेतील विद्यार्थी म्युझियम, टुरिझम अशा क्षेत्रांतील विविध संधीसुद्धा निवडू शकतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येयाची आवश्यकता असते. पुस्तकी अभ्यासाबरोबरच आपल्या अवतीभवतीची अनेक क्षेत्रे कुशल नेतृत्वांना खुणावत आहेत. मात्र, या क्षेत्रात जाऊन नावलौकिक प्राप्त करण्यासाठी कष्ट, जिद्द, प्रामाणिकपणा आणि सातत्य या गोष्टींची गरज असते. यामुळे कला शाखा ही व्यक्तीला रोजगाराभिमुख बनविणारी आहे."
प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी अध्यक्षीय समारोपातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, "कोणतीही शाखा ही विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख बनविणारीच आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आपल्या मधील कला-कौशल्य ओळखून, त्यांचा विकास करून रोजगाराभिमुख बनण्याची नितांत गरज आहे."
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. सच्चिदानंद ढेपे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. एल.बी.जाधवर, कार्यालय अधीक्षक श्री. केशव भोंडवे यांबरोबरच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्ता जाधव यांनी केले तर आभार प्रा. अनिल जोगदंड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!