मस्साजोग ते बीड सदभावना पदयात्रा: जातीय सलोख्यासाठी काँग्रेसचा पुढाकार
मस्साजोग ते बीड सदभावना पदयात्रा: जातीय सलोख्यासाठी काँग्रेसचा पुढाकार
8-9 मार्च रोजी पदयात्रा; धारूरमध्ये नियोजन बैठक
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: बीड जिल्ह्यात जातीय सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेसने 8 आणि 9 मार्च रोजी मस्साजोग ते बीड अशी दोन दिवसीय सदभावना पदयात्रा आयोजित केली आहे. या पदयात्रेच्या नियोजनासाठी 3 मार्च रोजी किल्ले धारूर येथील राहुल हॉटेलमध्ये बैठक झाली.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर रणदिवे , ज्येष्ठ नेते अंजनढव, सुबराव सोळुके, आवेज कुरेशी, नितीन मिश्रा, उत्तमराव ढगे, शेख शाफिक, यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात सुरू असलेल्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचे राहुल सोनवणे यांनी सांगितले. "गेल्या 80 दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. समाजात जाती-जातींमध्ये फूट पडत आहे. हे थांबवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ आणि खासदार रजनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढण्यात येत आहे," असे ते म्हणाले.
युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील यांनीही जातीय सलोख्याचे महत्त्व विशद केले. जिल्ह्यात जातीयवाद वाढला आहे. तो थांबवण्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीला कै. संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य विजय शिनगारे यांनी सूत्रसंचालन केले, तर सोळंके यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment