गांजपूरमध्ये महिला दिन उत्साहात साजरा; सरपंच डापकर यांच्या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


गांजपूरमध्ये महिला दिन उत्साहात साजरा; सरपंच डापकर यांच्या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बालविवाहविरोधी शपथ, गुणवंत माता-विद्यार्थिनींचा सत्कार, विविध मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर : गांजपूरमध्ये गेल्या दोन वर्षांत प्रथमच सरपंच बाळासाहेब डापकर यांच्या पुढाकाराने महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. ८ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका दराडे सर आणि जाधव मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देणाऱ्या मातांचा आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

सरपंच बाळासाहेब डापकर यांनी बालविवाहाबाबत माहिती देऊन, १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. गावात कोणी बालविवाह करत असल्यास १०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. उपस्थितांनी बालविवाह न करण्याची सामूहिक शपथ घेतली.

सरपंच डापकर यांनी जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व सांगून ती कशी जपावी, याबद्दल मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी विशाल सोनवणे यांनी पर्यावरण आणि स्वच्छता या विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांसाठी उखाणे आणि संगीत खुर्ची यांसारख्या मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली.

या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!