बीड पोलिसांचे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पाऊलप्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर डेस्कची स्थापना


बीड पोलिसांचे सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पाऊल
प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर डेस्कची स्थापना

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर : डिजिटल युगात सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र 'सायबर डेस्क'ची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे सायबर गुन्ह्यांविरुद्ध प्रभावीपणे लढण्यास मदत होणार आहे.
जगात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना, सायबर गुन्हेगार नागरिकांना आर्थिक फसवणूक, ओळख चोरी, मोबाईल चोरी, हॅकिंग, सायबर स्टॉकिंग आणि हानिकारक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष्य करत आहेत. यामुळे अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक त्रासाला बळी पडत आहेत.
या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी बीड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 'सायबर डेस्क' सुरू करण्यात आले आहेत. या प्रत्येक डेस्कवर एक विशेष प्रशिक्षित अधिकारी आणि दोन अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सायबर गुन्ह्यांचा तपास आणि मदतकार्यासाठी आवश्यक असलेले विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमामुळे आता मोबाईल हरवल्यास किंवा सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळू शकेल. या घटनांवर वेळीच आणि प्रभावी उपाययोजना करणे पोलिसांना शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक झाल्यास न घाबरता त्वरित आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यातील सायबर डेस्कशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे. बीड पोलिसांच्या या प्रभावी पावलामुळे जिल्ह्यातील सायबर गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!