किल्लेधारुरमध्ये राजमाता जिजाऊ महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा उत्साहात संपन्न!
किल्लेधारुरमध्ये राजमाता जिजाऊ महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा उत्साहात संपन्न!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात.
सुर्यकांत जगताप
किल्लेधारुर, दि. २ एप्रिल : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील पदवी वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. गौतम पाटील उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच पदवी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
प्राचार्य डॉ. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) नुसार शिक्षणात झालेल्या बदलांविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन स्वतःच्या जीवनात यशस्वी व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. राम शिनगारे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे यांनी सर्व पदवीधारकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी डॉ. नितीन कुंभार, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी डॉ. विजयकुमार कुंभारे, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी डॉ. एल. बी. जाधवर आणि एम.एस्सी झूलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. अशोक लाखे यांनी पदवी वाटप केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवीधर विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महादेव जोगडे यांनी केले, तर आभार डॉ. डी. बी. जाधव यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
परीक्षा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या सहकार्याने पदवी वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.