पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा धारूरमध्ये मुस्लिम बांधवांकडून तीव्र निषेध
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा धारूरमध्ये मुस्लिम बांधवांकडून तीव्र निषेध
सुर्यकांत जगताप
धारूर: काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांचे प्राण गेल्याच्या घटनेचा धारूर शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. शुक्रवारी जुम्मा नमाजानंतर शहरातील आणि तालुक्यातील मशिदींसमोर मुस्लिम बांधव एकत्र आले आणि त्यांनी काळ्या फिती लावून या दहशतवादी कृत्याचा निषेध केला.
यावेळी संतप्त मुस्लिम बांधवांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि या नासक्या अवलादीच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली.
सामाजिक कार्यकर्ते सादेकभाई इनामदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुस्लिम समाजाच्या धर्मग्रंथात अशा क्रूर घटनांचा तीव्र निषेध केला जातो. देशाची एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी जात-धर्म या पलीकडे जाऊन एकजुटीने अशा घटनांविरुद्ध लढण्याची गरज आहे. त्यांनी या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध केला.
या निषेध प्रदर्शनात धारूर शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला एक निवेदनही सादर करण्यात आले, ज्यामध्ये दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment