ग्रामीण रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रास्ता रोको
ग्रामीण रस्त्यांच्या दुर्दशेमुळे नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात रास्ता रोको
किल्लेधारूर आणि वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील नागरिकांचा बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाला अल्टिमेटम; ४ एप्रिलपासून थेटेगव्हाण चौकात आंदोलनाचा सुरू
सुर्यकांत जगताप
किल्लेधारूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. वळण वस्ती येथील रस्त्याची अवस्था तर इतकी बिकट झाली आहे की, यावरून वाहने चालवणेही मोठे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडल्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नसल्याने धारूर आणि वडवणी तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत.
बांधकाम विभाग आणि तहसील कार्यालयात अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी एकत्र येत ४ एप्रिल रोजी थेटेगव्हाण चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
धारूर-वडवणी मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे. रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना याच रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या नागरिक अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहेत. आता या त्रासाला कंटाळून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
धारूर व वडवणी तालुक्यातील चिंचवण- मार्गे चोरांबा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. धारूर तालुक्यातील पैठण आणि बीडकडे जाण्यासाठी हा सर्वात जवळचा आणि जलद मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र, रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या आंदोलनात चोरंबा, थेटेगव्हाण, पारगाव, सोनीमोहा, आंबेवडगाव, थिटेगव्हाण , दहिफळ, चिंचवन आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. नागरिकांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. आता बांधकाम विभाग आणि प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.