'दिला शब्द पुरा केला!' वडवणीत आमदार सोळंके यांच्या प्रयत्नातून ४७.८५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ!
'दिला शब्द पुरा केला!' वडवणीत आमदार सोळंके यांच्या प्रयत्नातून ४७.८५ कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ!
नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण योजना, भारतरत्न डॉ. आंबेडकर विकास योजनांसह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन; लवकरच जनता दरबार!
सुर्यकांत जगताप
धारूर : - माजलगावचे लोकप्रिय आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणी शहरातील नागरिकांना दिलेला विकासकामांचा शब्द खरा करून दाखवला आहे. आज वडवणी येथे तब्बल ४७.८५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
वडवणी शहरातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आमदार सोळंके म्हणाले, "वडवणी शहरातील लोकसवासियांनी मोठ्या विश्वासाने वडवणी नगरपंचायत आमच्या हाती दिली आणि या विश्वासाला तडा जाऊ न देता शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज ४७.८५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा याच प्रयत्नांचा भाग आहे."
आज भूमिपूजन झालेल्या विकासकामांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पासाठी २० कोटी रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी १० कोटी रुपये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेसाठी १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व उद्यान (५ कोटी), अभ्यासिका वाचनालय व व्यायाम शाळा (२ कोटी), बाजारतळ विकसित करणे (१ कोटी), जल शुद्धीकरण येथे संरक्षण भिंत (१ कोटी), विविध सभामंडप (१ कोटी), प्रभू श्रीराम मंदिर (३५ लक्ष), जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामे (१.५ कोटी) आणि शादीखाना (१ कोटी) यांसारख्या विकासकामांचा समावेश आहे.
आमदार सोळंके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "वडवणी शहरातील भौतिक विकासाच्या दृष्टीने हा भरीव निधी मंजूर झाला असून, आगामी काळात प्रलंबित विकासकामांसाठी लवकरच सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून वडवणी शहर आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून अनेक विकासकामांचा निपटारा होईल, याची ग्वाही मी देतो."
आज भूमिपूजन झालेल्या विकासकामांची गुणवत्ता आणि उत्कृष्ट दर्जा राखण्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक जातीने लक्ष देतील, असा विश्वास आमदार सोळंके यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विकासोन्मुख दृष्टिकोनामुळे वडवणी शहराच्या विकासाला निश्चितच नवी गती मिळणार आहे, अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या अथक प्रयत्नांमुळे वडवणी शहराच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे, हे निश्चित!