भिल्ल समाजाचा आक्रोश! स्मशानभूमीसाठी थेट तहसील कार्यालयाच्या दारात प्रेत; प्रशासनाचे दुर्लक्ष
भिल्ल समाजाचा आक्रोश! स्मशानभूमीसाठी थेट तहसील कार्यालयाच्या दारात प्रेत; प्रशासनाचे दुर्लक्ष
अनेकवेळा उपोषण करूनही प्रशासनाकडून दखल नाही; थेटेगव्हाण येथील संतप्त नागरिकांचा तीव्र पवित्रा
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर :- धारूर तालुक्यातील थेटेगव्हाण येथील भिल्ल समाजाच्या नागरिकांनी आज (७ एप्रिल) सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह आणून ठिय्या मांडला. गावाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयांसमोर उपोषण करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने नागरिकांचा रोष अनावर झाला आहे.
थेटेगव्हाण येथील भिल्ल समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर निवेदन दिले आणि उपोषणे केली. मात्र, प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आज एका मृत व्यक्तीचे पार्थिव घेऊन नागरिक थेट तहसील कार्यालयात धडकले आणि प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.
आपल्या न्याय्य हक्कासाठी आणि स्मशानभूमीच्या जागेसाठी नागरिकांनी मृतदेह तहसील कार्यालयाच्या दारात ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमले असून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
आता या गंभीर घटनेनंतर शासन काय भूमिका घेते आणि भिल्ल समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न कधी मार्गी लावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका समाजाला आपल्या मृत व्यक्तींसाठीही जागा मागण्याची वेळ आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment