ऐतिहासिक किल्ले धारूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत!
ऐतिहासिक किल्ले धारूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे जल्लोषात स्वागत!
तेलगाव रोडवर रात्रीतून पुतळा स्थापित; नागरिकांकडून फटाके आणि घोषणाबाजीने आनंदोत्सव
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर: ऐतिहासिक किल्ला असलेल्या धारूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेलगाव रोडवर दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला. याची माहिती मिळताच आज सकाळी (दिनांक ४ एप्रिल) धारूर शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी या महत्त्वपूर्ण घटनेचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आला. सकाळी जेव्हा नागरिकांना याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’, ‘जय भीम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेक नागरिकांनी आनंद व्यक्त करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
सध्या या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही, मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित असून, तेथे जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. धारूर शहर आणि तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांमध्ये या घटनेमुळे आनंदाची लाट पसरली आहे. अनेकजण पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी येत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण आहे, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.