किल्ले धारूर पंचायत समितीची कारवाई: माजी सरपंच आणि ग्रामसेवकांवर अनियमिततेचा ठपका
किल्ले धारूर पंचायत समितीची कारवाई: माजी सरपंच आणि ग्रामसेवकांवर अनियमिततेचा ठपका
तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि कंत्राटदारांवर अपहार आणि अनियमिततेचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश
सुर्यकांत जगताप
किल्लेधारूर तालुक्यातील सुरनरवाडी गावात मागील पाच वर्षांच्या कालावधीत झालेल्या कामांमध्ये अनियमितता आणि आर्थिक अपहार झाल्याच्या संदर्भात पंचायत समितीने कठोर पाऊल उचलले आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी तात्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरनरवाडी तत्कालीन सरपंच शिवाजी काळे आणि ग्रामसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने गावात केलेल्या विविध विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पंतप्रधान आवास योजना, राष्ट्रीय रोजगार हमी योजना तसेच इतर २४-२५ कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. या तक्रारींनुसार, ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करून सुरनरवाडी गावातील कामांची कसून चौकशी करण्यात आली. या समितीने २ मे २०२५ रोजी आपला अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला. या अहवालामध्ये गंभीर स्वरूपाची आर्थिक अनियमितता व अपहार दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून तात्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि ज्यांच्या कार्यकाळात अनियमितता झाली, अशा कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस देऊन अंतिम अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जबाबदार व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र ग्रामविकास अधिनियम १९६१ नुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे लेखी आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या कठोर भूमिकेमुळे आता सुरनरवाडी गावातील गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे सुरनरवाडी मधील तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवकांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर गटविकास अधिकारी आता पुढील कायदेशीर कार्यवाही करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment