वादळी पावसाने,नागरिक भयभीत; पावसाळ्यापूर्वी कामांची मागणी, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे!
वादळी पावसाने,नागरिक भयभीत; पावसाळ्यापूर्वी कामांची मागणी, प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे!
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर (विशेष प्रतिनिधी): दि. २० मे २०२५ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता किल्ले धारूर शहरावर अचानक आलेल्या वादळी पावसाने मोठे थैमान घातले. गेल्या काही दिवसांपासून धारूर शहर आणि तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान होत असताना, कालच्या वादळाने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. प्रचंड वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे शहरात अनेक झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. या अचानक आलेल्या संकटाने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी जीव मुठीत धरून घरात आश्रय घेतला.
या वादळी पावसामुळे शहराचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. विद्युत खांब कोसळल्याने शहराचा वीजपुरवठा खंडित झाला असून, अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
विशेष म्हणजे, अवकाळी पावसामुळे वारंवार होणारे नुकसान लक्षात घेता, नगरपरिषद आणि वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे अद्यापही सुरू केलेली नाहीत. झाडांच्या फांद्या छाटणे, जुनाट विद्युत तारा बदलणे, खांब दुरुस्त करणे यांसारखी आवश्यक कामे प्रलंबित असल्यानेच दरवर्षी नागरिकांना अशा नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करावा लागत आहे. हीच निष्क्रियता कालच्या मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याचे धारूर शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
धारूर शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भविष्यात अशा आपत्त्यांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने वेळीच पाऊले उचलणे गरजेचे आहे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित जीवन जगता येईल आणि त्यांचे नुकसान टाळता येईल.
Comments
Post a Comment