शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करा! योगेश साखरे यांचा सरकारला इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करा! योगेश साखरे यांचा सरकारला इशारा
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: "विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन सरकारने तातडीने पूर्ण करावे, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा स्पष्ट इशारा शेतकरी कामगार पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश साखरे यांनी दिला आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि सरकारला आपली जबाबदारी आठवण करून दिली.
निवडणुका होऊन वर्ष उलटले, तरी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही, याबद्दल साखरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "सरकार सत्तेत आल्यावर कॅबिनेट मंत्रिमंडळाचा पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा असेल," असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता सरकार या आश्वासना पासून पळ काढत आहे, असा आरोप त्यांनी केला.
पेरणीचे दिवस तोंडावर आले आहेत आणि शेतकऱ्यांना तातडीने नवीन अर्थसाहाय्याची गरज आहे. अशा परिस्थितीत, कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे, असे साखरे यांनी निवेदनात नमूद केले. बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, निसर्गाची अनियमितता, वाढलेले बी-बियाणे आणि खतांचे दर यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
"2024 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते मिळवली. मात्र, त्यानंतर त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला," असे साखरे यांनी सांगितले. "शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सरकारने केले, तर शेतकरी कामगार पक्ष शांत बसणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सरकारने तातडीने कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी साखरे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्यास, ते अधिक उत्साहाने शेती करू शकतील आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक योगदान देऊ शकतील. सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दिलेले आश्वासन पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment