उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तत्परता; मुख्य रस्त्यावरील बुजलेला बोर सुरू
उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तत्परता; मुख्य रस्त्यावरील बुजलेला बोर सुरू
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर (प्रतिनिधी): शहरातील मुख्य रस्त्यावरील बालाजी मंदिर परिसरातील बुजलेला बोर सुरू करण्याच्या सामाजिक कार्यकर्ते रोहित फावडे यांच्या मागणीला यश आले आहे. फावडे यांनी यासंदर्भात नगरपरिषदेला निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता, ज्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत बोअरवेल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू असताना बालाजी मंदिरा समोरचा चालू असलेला बोर नगरपरिषदेने बुजवून टाकला होता. यामुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय होणार होती. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते रोहित फावडे यांनी २९ एप्रिल २०२५ रोजी नगरपरिषदेला अर्ज करून त्वरित बोर सुरू करण्याची मागणी केली होती. मागणीची दखल घेत नगरपरिषदेने आठ दिवसात दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
शहरात अनेक ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी बोअरवेल असून, नळाला पाणी न आल्यास नागरिक त्याचा वापर करतात. मात्र, मुख्य रस्त्याचे काम आणि पाईपलाईनच्या कामामुळे अनेक दिवस पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यातच बालाजी मंदिरासमोरील बोर बुजवल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, तसेच पाणी विकत घेण्याची वेळ आली होती.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत रोहित फावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नगरपरिषदेला अर्ज देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत बालाजी मंदिरासमोरील बोअरवेल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
रोहित फावडे यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. नागरिकांनी त्यांच्या कार्याचे आभार मानले आहेत. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment