निमंत्रण न मिळाल्याने शेतकरी कार्यशाळेवर नाराजी; कृषी कार्यालयावर शेतकऱ्यांचा रोष




निमंत्रण न मिळाल्याने शेतकरी कार्यशाळेवर नाराजी; कृषी कार्यालयावर शेतकऱ्यांचा रोष

सुर्यकांत जगताप  

धारुर: तालुका कृषी विभागाने आयोजित केलेल्या खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळेत शेतकऱ्यांना निमंत्रण न दिल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पंचायत समिती सभागृहात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मात्र, तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना या महत्त्वपूर्ण कार्यशाळेची माहितीच देण्यात आली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. पेरणीपासू

न ते काढणीपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होते. याच उद्देशाने कृषी विभाग दरवर्षी कार्यशाळांचे आयोजन करत असतो. मात्र, यावर्षी ऐन हंगामाच्या तोंडावर आयोजित केलेल्या कार्यशाळेपासून शेतकऱ्यांना दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार होते. यात मा. कृष्णा कर्डीले (कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दिघोलअंबा), मा. डी. डी. जाधव (कृषी उपसंचालक, जि.प. बीड), श्री. जे. बी. भगत (तालुका कृषी अधिकारी, धारुर), मा. संतोष शिनगारे (विभागीय समन्वय, पाणी फाउंडेशन), मा. धर्मराज थोरात (शेतीनिष्ठ शेतकरी, पांगरी), मा. श्री. उमेश सरवदे (जिल्हा संसाधन व्यक्ती, पीएमएफएमई), मा. श्री. अंगद डापकर (प्रगतीशील शेतकरी) यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेते मा. श्रीमती प्रियंका गणेश सावंत हे देखील मार्गदर्शन करणार आहेत.
इतक्या महत्त्वपूर्ण व्यक्ती मार्गदर्शन करणार असतानाही शेतकऱ्यांना निमंत्रण न देणे हे कृषी विभागाच्या नियोजनशून्यतेचे उत्तम उदाहरण आहे, असे संतप्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक शेतकऱ्यांनी  प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, "आम्ही वर्षभर शेतीत राबतो. नवीन तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी अशा कार्यशाळा आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. मात्र, कृषी विभागाने आम्हाला विश्वासात न घेता आणि निमंत्रण न देता ही कार्यशाळा आयोजित केली, हे अत्यंत निराशाजनक आहे."
शेतकऱ्यांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, जर ही कार्यशाळा केवळ कृषी विभागातील अधिकारी आणि काही निवडक लोकांसाठीच होती, तर ती शेतकऱ्यांसाठी आयोजित केली आहे, असे निमंत्रण पत्रिकेत का नमूद केले? यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि वेळेवर माहिती न मिळाल्याने ते या महत्त्वपूर्ण संधीला मुकले आहेत.
तालुक्यातील शेतकरी संघटनांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. कृषी विभागाने तातडीने याची दखल घेऊन शेतकऱ्यांची माफी मागावी आणि भविष्यात अशा चुका टाळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये पसरलेला हा असंतोष कृषी विभागासाठी निश्चितच भूषणावह नाही.

Comments

Popular posts from this blog

धारूर न्यायालय परिसरात हाणामारी; पत्रकारावर हल्ला, न्यायालयात खळबळ

अतिक्रमण हटवण्यावरून व्यापारी आणि नगरपरिषदेत मतभेद; रस्ता दुरुस्तीचे काम रखडण्याची शक्यता

श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलची सयाजीराजे पार्कमध्ये धमाल सहल!