ज्ञानदीप विद्यालयात बालसंस्कार शिबिराचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न गटनेते सुधीर (तात्या ) शिनगारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
ज्ञानदीप विद्यालयात बालसंस्कार शिबिराचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न
गटनेते सुधीर (तात्या ) शिनगारे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
सुर्यकांत जगताप ( पत्रकार )
किल्ले धारूर: किल्ले धारूर तालुक्यातील ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय आणि बालसंस्कार केंद्र येथे दि. १ जून ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या बालसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, शारीरिक वृद्धी व्हावी आणि आरोग्यसंपदा लाभावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. धारूर नगरीचे गटनेते, युवा नेते श्री. सुधीर (तात्या )शिनगारे यांच्या शुभहस्ते या शिबिराचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
आज संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात माता सरस्वती तसेच मर्दानी खेळांशी संबंधित साहित्य जसे की, तलवार, दांडपट्टा, भाला यांच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिबिराचे औपचारिक उद्घाटन झाले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्री. चंद्रकांत देशपांडे (ज्येष्ठ पत्रकार), मा. श्री. सुधीर तात्या शिनगारे, मा. श्री. नागनाथ सोनटक्के, मा. श्री. अनिल महाजन, मा. श्री. मनोज कापसे, सौ. शैला महाजन, मा. श्री. बाबासाहेब मुंडे, तसेच हस्ताक्षर प्रमुख मा. श्री. अर्जुन भालेराव सर, मा. श्री. योगेश गुंजकर, श्री. आशुतोष जाधव, चि. शिवरत्न गुंजीकर आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. सौरभ शिंपले आदी मान्यवर उपस्थित होते.
या संस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शारीरिक विकास व्हावा आणि उत्तम संस्कार घडावेत या हेतूने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये योगासने, प्राणायाम, चित्रकला, हस्तकला, हस्ताक्षर सुधारणा यांसारख्या पारंपरिक उपक्रमांसह मर्दानी खेळ जसे की लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आणि मल्लखांब अशा अनेक रोमांचक उपक्रमांचा समावेश आहे.
संस्कार शिबिराच्या या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सचिन चव्हाण यांनी केले. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. चंद्रकांत देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. सौरभ शिंपले यांनी विद्यालयातील आपले अनुभव कथन करत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्री. मुंजाराम निरडे यांनी मानले.
या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. हे शिबिर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment