आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रयत्नाने किल्ले धारूर पाणीपुरवठा योजनेला गती; उंच टाकीसाठी जागा उपलब्ध
आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या प्रयत्नाने किल्ले धारूर पाणीपुरवठा योजनेला गती; उंच टाकीसाठी जागा उपलब्ध
( सुर्यकांत जगताप पत्रकार )
किल्ले धारूर शहरासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेतील उंच पाण्याच्या टाकीच्या उभारणीसाठी जागेची समस्या अखेर मार्गी लागली आहे. आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यासाठी आवश्यक असलेली अंदाजे 4 आर (R) जागा उपलब्ध करून देण्यास "ना हरकत प्रमाणपत्र" (No Objection Certificate) दिले आहे. यामुळे किल्ले धारूर शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास मदत होणार आहे.
किल्ले धारूर नगर परिषदेने पाणीपुरवठा योजनेसाठी उंच पाण्याची टाकी उभारण्याकरिता जिल्हा परिषदेच्या मालकीच्या हुतात्मा स्मारक परिसरातील जुन्या जिल्हा परिषद शाळेसमोरील, भुमापन क्रमांक 362/अ/2 मधील जागेची मागणी केली होती. यासंदर्भात नगर परिषदेने 5 जून 2025 रोजी आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, धारूर यांच्या मुख्याध्यापकांनी 3 जुलै 2025 रोजी पत्रव्यवहार केला होता.
आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून, नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन, जिल्हा परिषद, बीडच्या शिक्षण विभागाने 24 जुलै 2025 रोजी पाणीपुरवठा योजनेतील उंच पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान (भाप्रसे) यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रानुसार, हुतात्मा स्मारक परिसराच्या बाजूला असलेल्या जुन्या जिल्हा परिषद शाळेसमोरील किल्ले धारूर शहराच्या हद्दीतील भुमापन क्रमांक 362/अ/2 मध्ये अंदाजे 4 आर जागेत उंच पाण्याची टाकी उभारण्यास कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे किल्ले धारूर येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या यशाचे श्रेय आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांना दिले जात आहे. यासंदर्भात तहसिलदार, तहसिल कार्यालय किल्ले धारूर आणि गट शिक्षणाधिकारी, किल्ले धारूर यांनाही माहितीस्तव व योग्य कार्यवाहीसाठी प्रत पाठवण्यात आली आहे.
Comments
Post a Comment